श्रमदानातून म्हसवंडी गावच्या तरुणांनी केली रस्तादुरुस्ती.
प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तरुणांचे तसेच अप्रत्यक्षरित्या आर्थिक मदत केलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार🙏
https://m.maharashtratimes.com/…/h…/articleshow/66849563.cms
संगमनेर : तालुक्यातील म्हसवंडी येथील एकता फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांनी पुणे-नगर जिल्हाच्या सरहद्दीवरील बोर घाटातील खड्डे रात्रीतून बुजविले. यासाठी लोकवर्गणीसोबत युवकांनी श्रमदानही केले.
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात जाण्यायेण्यासाठी संगमनेर, अकोले तालुक्यातील म्हसवंडी, बेलापूर, जाचकवाडी, आंबीदुमाला, भोजदरी येथील नागरिक म्हसवंडीजवळील बोर घाटाचा वापर करतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीमाल जुन्नर तालुक्यातील ओतूर, आळेफाटा या बाजार समितीत नेण्यासाठी २५ किलोमीटरचे अंतर वाचते. मोठी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर घाटातील ५०० मीटर रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. कारसह छोट्या वाहनांचे फारच नुकसान व्हायचे. दुचाकीही घसरत होती. दुचाकीस्वार किरकोळ जखमी होत होते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाला चालना देण्यासाठी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी आमदारांपासून पंचायत समिती सदस्यांपर्यंत सर्वांकडे कामासाठी पाठपुरवटा केला; मात्र, त्याचा उपयोग होत नसल्याने या वैतागाला कंटाळून हे खड्डे बुजविण्यासाठी म्हसवंडी येथील एकता फाउंडेशनच्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेतला. श्रमदान करून मुरूम, माती व जेसीबीच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्यात आले. यासाठी युवकांनी वर्गणीकाढून ३० हजार रुपये खर्च केला आहे. यातील बहुतांश तरुण हे मुंबई येथे नोकरी करतात. हा रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करून देण्याची मागणी या तरुणांनी केली आहे.