भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी.
आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत. या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात तर भर घालतातच परंतु यांचे जाळे ज्या ज्या ठिकाणी पसरलेले आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलत आहे.
सिंगापूर सारख्या देशाचा विचार केला तर स्वतःचे पिण्याचे पाणी नसुन सुद्धा हा देश पर्यटनक्षेत्रात जगात बाप बनला आहे. का? याचे उत्तर शोधले तर निश्चितच तेथील मॅनेजमेंटला शाब्बासकी द्यावी वाटते. महाराष्ट्रात अशा मॅनेजमेंटची खरोखर गरज आहे. आपले पर्यटक होणाऱ्या -हासाच्या बाजुने विचार करत नाहीत त्यामुळे पर्यटन स्थळांचा मोठ्या प्रमाणावर -हास होत आहे. याला जबाबदार आपणच स्थानिक ग्रामस्थ म्हणावे लागेल. यावर त्वरीत उपाय अंमलात आणणे ही नैतिक जबाबदारी ही तेथील गावकरी व स्थानिकांचीच आहे. मग त्यासाठी उपाययोजना या तेथील गावक-यांनी पुढे येऊन राबविल्या तर निश्चितच पर्यटन वाढीतुन गाव विकासाला एक जबाबदार पर्यटन म्हणुन चालना मिळेल व गावचा विकास पण झपाटय़ाने होइल . हीच संधी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, खामुंडी तसेच संगमनेर व अकोले तालुक्यातील म्हसवंडी आणि बदगी या गावांना नैसर्गिक रित्या चालून आलेली आहे. कारण या तालुक्यांना जोडणा-या घाटवाटा म्हणजे मुक्त हस्ते निसर्ग देवतेने उधळण केलेल्या सौंदर्याची साक्ष आहेत.आणि मग सहज कवितेच्या दोन ओळी ओठांवर येतात. “हिरवे हिरवे गार गालिचे,हरित तृणांच्या मखमालीचे” येथे आपणास जिकडे नजर मारालं तीकडे सह्याद्री पर्वतरांगा, त्यावरून फेसाळनारे धबधबे , धुक्यातून डोकी काढनारे सह्याद्रिची सुळके दिसु लागतात.
येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत
मार्ग १ –
पुणे नाशीक हायवे वर बोटा हे गाव आहे .
बोटा येथुन पश्चिमेस म्हसवंडी हे गाव आहे तर जाचकवाडी मार्गे बेलापूर बदगीला पोचता येते.
(आळेफाटा – बोटा – आंबीफाटा – म्हसवंडी )
(आळेफाटा – बोटा – आंबीफाटा – जाचकवाडी )
मार्ग -२
नगर कल्याण हायवे वर पिंपरी पेंढार गाव आहे .
पिंपरी पेंढार येथुन पश्चिमेस हायवेवर उजव्या बाजूला म्हसवंडी साठी जाणारा रस्ता आहे. व येथुनच पुढे साधारण ४ किलोमीटर अंतरावर म्हसवंडी घाटाची सुरूवात होते. घाटवाट कच्ची असल्याने साधारणतः दुचाकीचा वापर योग्य आहे.
पिंपरी पेंढारपासून पुढे कल्याणकडे जाताना उजव्या हाताला बदगी कडे जाणारी एक पक्की सडक आहे या वाटेने उत्तरेकडे जवळपास 2 कि.मी अंतरावर खामुंडी घाटाची सुरूवात होते व घाटवाट चढुन बदगीस पोहचता येते.
( आळेफाटा – पिंपरी पेंढार – म्हसवंडी )
( आळेफाटा – पिंपरी पेंढार – बदगी फाटा -बदगी )
आपण म्हसवंडी घाट मार्गाने जर प्रवास करणार असाल तर प्रथम म्हसवंडी घाटाचे मनमोहक दृश्य अनुभवत पुढे आपण उजव्या बाजूला पुर्वेस म्हसवंडी गावाकडे निघावे जवळच उत्तर दक्षिण दुर्गूडी डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या पायथ्याशी पश्चिमेस 200 वर्षे पुराने मळादेवीचे पौराणिक मंदिर व सुंदर परीसर पहावयास मिळतो.गाडी पार्क करून येथे दर्शन झाल्यावर हळु हळु या पुर्वेस डोंगर रांगेवर चढण्यासाठी सुरूवात करावी. सोबत एक पाण्याची बाटली असावी.
घाट दर्शन झाले होते, मी व विनायकने मळादेवीचे दर्शन घेत याच प्रवासाला सुरुवात केली होती. तसा हा डोंगर सोप्या चढाई श्रेणीतील असल्याने विशेष काळजी घेण्यासारखे काहीच नव्हते. सोबतीला वाटाड्या म्हणुन बेलापुरची 4/5 वीची शाळकरी मुले शनिवारची सुट्टी झाल्याने सोबती झाली होती. जाम खुष होती ही चिमुरडी. शहरापासून लांब असलेल्या या मुलांना आम्ही काही वेगळे भासत होतो असे वाटत होते. प्रथम बुजणारे हे आमचे वाटाडे आता 200 मी चढाई केल्यावर मिसळू लागले होते. आई बापा विषयी त्यांचा आदर पाहून तर खुपच समाधान वाटले. कविता गाणी म्हणता का म्हटले तर हो म्हटले. आई बापाची गाऊन म्हटलेली कवीता तर ह्रदयाला छेद करणारी होती. रोम रोम उभे करणारे प्रसंग त्या चिमुरड्या बहादराने कवीतेच्या कडव्यात उभे केले होते. तो गात होता व मी घालवलेल्या भुतकाळात अचानकपणे फेकला गेलो होतो. गरीबिच्या झळांच्या छटा डोळ्यांपुढे त्याने सहज गाताना उभ्या केल्या होत्या. डोळ्यांच्या खाचेत दवबिंदू तरळु लागले होते. दुर्गुडीची ती डोंगररांग त्याच्या ओठातून पडणारा प्रत्येक शब्द आपल्या ह्रदयात साठवत होती. मळादेवी व मंदिरपरीसर दुरून शोभिवंत दिसत होता. पानलोट विकासाच्या कामांचा उत्कृष्ट उपयोग येथील ग्रामस्थांनी केलेला दिसत होता. वरूण राज्याच्या कृपेने त्यामध्ये जागोजागी साचलेले पाणी गाव विकासाला शेतीच्या माध्यमातून हातभार लावताना दिसत होते. शेवटी आम्ही दुर्गुडीच्या नैसर्गिक गुहेपाशी उत्तरेकडून पोहचलो.
सुमारे १२ फुट उंच आणि 30 फुट रूंद व 35 फुट लांब डोंगराच्या पोटात शिरलेली ही नैसर्गिक अशी ही गुहा आहे की जीचा आकार पुढे कमी कमी होत जातो आणि शेवटी एकदम अरुंद होतो जेथे कुणालाही जाता येत नाही. या गुहेत मी व विनायक चित्रिकरणासाठी आत शिरलो होतो. ते आपणास निश्चितपणे Nisargramya Junnar Taluka” या युट्यूब चायनलवर लवकरच पाहता येईल. येथील स्थानिक ग्रामस्थ असं सांगतात की गुहा किती खोल आहे याचा कुणाला अंदाज घेता येत नाही. तसी ही नैसर्गिक गुहा वाहत्या पाण्याने कच्या खडकावर वातावरणाच्या परीणामातून निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. गुहेची दर्शनी बाजु भव्यदिव्य आहे .या जागेत जवळपास ३०-४० लोकं आरामात बसु शकतात . पुर्वी लपण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून लोक ह्या गुहेचा वापर करत .
स्थानिक ग्रामस्थ अतिशय गमतीदार आख्यायिका सांगतात की शिवाजी महाराजांच्या राज्यात अहमदनगर वरुन जुन्नर ला जाताना या मार्गाचा वापर केला जायचा आणि रात्रीचा मुक्काम या गुहेत केला जायचा .
चहु बाजूंनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा … त्यावरुन धुक्याची चादर ओढलेल्या डोंगररांगा व वरुन फेसाळनारे पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे, सतत कोसळणारा संततधार पाऊस यामुळे या परिसरास सुंदरतेचे चार चांद लागले आहे. याच डोंगराच्या पुर्वेस जोडूनच एक शिखर दिसते त्याची रचना फक्त आणि फक्त मोकळ्या दगडांत पहावयास मिळते. या डोंगराच्या शिखरावरून म्हसवंडी गावचे अलौकिक सौंदर्य न्याहाळता येते. विशेष म्हणजे या शिखरावरून जुन्नर तालुका परीसर दृश्य पाहून मन अगदी थक्क होऊन जाते.मी तर म्हणेन की येडगाव धरणाचे संपूर्ण दृश्य जर पहायचे असेल तर या पेक्षा सुंदर ठिकाण दुसरे नाहीच.
आम्ही सर्व दृश्य डोळ्यांत साठवत उतरणीला लागलो. खाली उतरल्यावर चिमुरड्यांचा निरोप घेत दुचाकीवरून म्हसवंडी गावाकडे निघालो. गावात पोहचलो तेव्हा समजले, मौज मज्जा या व्यतीरिक्त जर काही शिकायचे असेल तर म्हसवंडी गावात
पाणलोट प्रकल्प प्रशिक्षण , महीला सबलीकरण प्रशिक्षण केंद्र आहे .या केंद्रास आजपर्यंत देशातल्या सर्व राज्यांच्या टीम येउन गेल्या आहेत , तसेच परदेशातल्या विवीध देशाच्या ७० टीम येथे भेट देउन गेल्या आहेत. या केंद्राला भेट द्यायची असेल तर आधी तसं कळवावे लागते.
गावातील लाकडी दुमजली मारूती मंदिर पौराणिकता व जुनेपण टिकून आहे. मोरांच्या वास्तव्याची जान येथे येणाऱ्या त्यांच्या आवाजातुन येते. शासकीय आश्रमशाळा तर येथील खास आकर्षण वाटते. येथुन पुढे आम्ही निघालो होतो ते बेलापूर पहावयास. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गाव होत. जाचकवाडी व तेथील वेताळेश्वराचे दर्शन घेत व परीसर अनुभव घेत आम्ही बेलापूर मध्ये पोहचलो. वेशीतुन आत आल्यावर विविध जुन्या वाड्यांचे दर्शन घडले. भैरवनाथाच्या मंदिराबाहेर अगदी माईलस्टोनरूपात गाडलेल्या एका विरघळीने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले व सर्व उलगडा बेलापूरचा झाला तो इथेच. भैरवाचे जुने मंदिर व शेजारी असलेले लुप्त हेमाडपंती महादेव मंदिर व अवशेष तसेच पुष्करणीच्या भिंतीत गाडलेल्या पाऊलखुणा व मुर्त्या. खरच हे गाव इतिहासाकारांना निरिक्षण व अभ्यास म्हणून पर्वणीच आहे. येथील सर्वात मोठा व चर्चेचा विषय ठरले ते येथील पौराणिक योगी रामदासबाबा संजीवन समाधी मंदिर, याच मंदिरा समोर लक्ष वेधून घेतो तो खापरी कौलारू स्वरूपाचा सरंजाम. येथे अनेक ग्रामस्थ घडल्याचे स्थानिक सांगतात. येथील वाड्यांचा विशेष अभ्यास करता येईल. सर्व काही पाहून व गाडे मावशींनी बनवलेल्या चहाचा स्वाद घेत आम्ही बदगीकडे जाण्यासाठी निघालो.
निसर्गाची किमया पाहत पाहत आम्ही बदगीला पोहचलो. गावातील राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले. मग काय दुचाकी उभी करत नकळतच हात झुकले ते त्यांना मुजरा करण्यासाठी. बदगीतील बारव पाहण्यासारखी आहे. चौकोणी आकाराच्या या बारवेला उत्तम थारोळ्याची रचना केली आहे ती उत्तर दिशेने. चारही बाजूंनी पाणी शेंदण्यासाठी उत्तम रहाटाची सुविधा केली असून पुर्वेकडून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकीची सुविधा केली आहे. परंतु ही बारव तलावात पोहत असल्याने जास्त काही निरीक्षण करता आले नाही. परंतु हा याच तलावात वाळलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर पिंपळवृक्षाने हात बाहेर काढून आंब्याचा सहारा घेत आपल्या आयुष्याला केलेली सुंदर सुरूवात पाहून आश्चर्य वाटते. कारण पिंपळवृक्षाच्या मुळ्या जमीनीस स्पर्श करताना दिसत नाहीत व झाड वाळलेले आहे मग ते जिवंत कसे? हे एक आश्चर्य वाटले.
परतीचा प्रवास सुरू झाला होता. घाट माथ्यावर पोहचलो होतो. घाटमाथ्यावरील शंकराच्या हातातील त्रिशुळाच्या रचनेतील रस्ता पाहून या वाटेचे वेगळेच दर्शन घडले. या घाटाने प्रवास करताना माळशेज घाटवाटेने आपण प्रवास करतो की काय असा भास होतो. पुर्वेकडील डोंगररांगेवर फेसाळनारे धबधबे पहावयास मिळतात. मित्रांनो एक विनंती असेल की मला जुन्नर जुन्नर तालुक्यातील सर्वात ठिसुळ खडक असलेली घाट वाट आढळून आली ती हीच खामुंडी घाट वाट. त्यामुळे भर पावसाळ्यात या वाटेवर निश्चितच थांबू नका नये. जुन्नर व ओतुर परिसराच्या सुंदर दृश्याचा अनुभव येथे होतो.
पोटात कावळे ओरडून सांगू लागले होते. तुमच फिरणे झाले असेल तर आमच्याही थोडा विचार करा. म्हणून दुचाकीचा वेग वाढवला होता तो जुन्नर च्या दिशेने त्या पोटातील ओरडणा-या कावळ्यांची भुक शांत करण्यासाठी. जाता जाता एकच सांगेल की एकदिवसीय उत्तम ट्रेक जर निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा असेल व तोपण दुचाकीवरून तो हाच दोन घाटमार्ग ट्रेक.
हे वैभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आमचा चायनलवर पाहु शकता. YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G
लेखक – श्री खरमाळे रमेश
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – जुन्नर
वनविभाग जुन्नर
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
सदस्य :- रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…